आनंददायी उपक्रम

आज मला खूप आनंद झाला. माझ्या मुलाला वेशभूषेचे बक्षीस मिळाले. त्याच्या चेहऱ्यावर देखील हसू आहे. खरे तर तो काही करू शकेल असे वाटत नव्हते. पण आज तुमच्यामुळे थोडा तरी आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद! एक आई पालक माझ्याशी बोलत होत्या. महाभोंडला दांडिया या कार्यक्रमाबद्दल त्या बोलत होत्या. या उपक्रमात उत्तम दांडिया खेळणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे उत्तम वेशभूषा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस दिले जाते. एका शाळेने ज्ञानेश्वर माऊली चा वेष करून ज्ञानेश्वरी वाचणारा एक मुलगा अशा पेहराव असलेला एक मुलगा केला होता तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याला प्रथम क्रमांक जाहीर झाला होता मदतीला आलेली आई माझ्याशी बोलत होती. आपण करीत असलेल्या कार्याची पावती मला मिळाली होती व अजून उपक्रम करण्यास प्रेरणा मिळाली.
मतिमंद विद्यार्थ्यांना शिकवताना अनेक अनुभव आले. खूप काही शिकायला मिळाले. पण एक गोष्ट लक्षात आली की या विद्यार्थ्यांमध्ये काही कलागुण असतात. गायन, नृत्य, नाट्य, चित्रकला, क्रीडा हे विद्यार्थी उत्तम करू शकतात. शिक्षक विद्यार्थ्यांचे
कलागुण ओळखून त्यांना त्या विषयाचा सराव करून घेतात. विद्यार्थ्यांचे कलागुण समाजासमोर आणणे त्यांना व्यासपीठ मिळवून देणे, संधी देणे मला आवश्यक वाटले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व जिद्द वाढणार होती. तसेच स्पर्धा घेतली तर शिक्षकांच्या बुद्धीला चालना देऊन नव नवे प्रयोग ते करू शकणार होते. आपला पाल्य काहीतरी छान प्रशिक्षण घेतो याचे समाधान पालकांनाही मिळणार होते. या उद्देशाने काही उपक्रम सुरू करण्याचे ठरवले. पण यासाठी मनुष्य बळ व आर्थिक सहकार्य मिळणे गरजेचे होते.
याचा विचार करूनच लायन्स क्लब या सामाजिक कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेची सभासद झाले.
समूह गीत स्पर्धा, समुह नृत्य स्पर्धा, महाभोंडला दांडिया, जल्लोष, बालदिन, पुस्तक हंडी, दही हंडी, व्हील चेअर वाटप असे उपक्रम सुरू केले. पुण्यातील सर्व मतिमंद विद्यार्थ्यांसाठी हे उपक्रम सातत्याने सुरू आहेत. स्पर्धेतून सहभागी होणाऱ्या संस्थांचा परिचय लायन सभासदांना झाला. त्यामुळे काही संस्थांना वस्तू रुपात, देणगी देऊन मदत मिळू लागली.
सुरवातीला या स्पर्धा घेणे अवघड गेले. स्पर्धेची परवानगी घेणे, संस्थांना पत्र देणे, जागा निश्चित करणे, प्रत्यक्ष स्पर्धा घेणे, बक्षिसे, स्नेहभोजन हि तारेवरची कसरत होती. पण हे उपक्रम घेताना अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या, लायन्स क्लबचा सहभाग मिळाला, सातत्याने हे उपक्रम केल्याने, वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळाली. जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सराव व संधी मिळाली. हे हे सर्व उपक्रम सातत्याने तेरा वर्ष सुरू आहेत. हे उपक्रम घेत असताना अठरा वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रमाणे शिक्षकांसाठी कार्यक्रम घेतला.
सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संस्थांचे शिक्षक सहभागी झाले होते. उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला, सोशल वर्कर चा पण सन्मान केला. जल्लोष या कार्यक्रमाची विश्व विक्रमी उपक्रम म्हणून नोंद झाली. सध्या बालक पालक प्रकल्प

दिव्यांगाना समान संधी, हीच प्रगतीची नांदी !

साकारत आहोत. याठिकाणी बालक म्हणजे मतिमंद विद्यार्थी व पालक म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे पालक यांना एकत्र निवास व्यवस्था अशा प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे विद्यार्थी जसे वयाने मोठे होतात तसे पालकांचे पण वय वाढलेले असते व एकवेळ अशी येते की दोघानाही आधाराची गरज असते. हा प्रकल्प म्हणजे काळाची गरज आहे. विद्याध्यर्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेऊन सर्व उपक्रम सातत्याने सुरू आहेत. हे टीम वर्क आहे. यासाठी लायन्स क्लब त्यांचे सभासद, शिक्षक, पालक, मित्र परिवार यांचे सहकार्य मिळते म्हणून उपक्रम यशस्वी होतात. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. काही विध्यार्थी उत्तम गाणे म्हणतात तर काही नृत्य करतात, कला
क्रीडा क्षेत्रात यश मिळवितात. शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य मिळते देणाऱ्याचे हात हजारो… प्रमाणे नवीन उपक्रमास चालना मिळते व आर्थिक सहकार्य करणारे देणगीदार पाण मिळतात.
निस्वार्थी वृत्तीने केलेल्या कामास यश मिळते. हेतू साध्य होताना दिसतो. हा जगन्नाथाचा रथ आहे. असे कार्य सर्वांच्या सहकार्याने सातत्याने सुरू रहाणार आहे यातून दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद मिळणार आहे त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल याची खात्री आहे.

दया नको संधी द्या ! बौद्धीक अक्षम दिव्यांग विद्यार्थ्यांना सामावून घ्या !

 

सौ सीमा सुहास दाबके

Scroll to Top