दिव्यांग व्यक्तींसाठी पोषण
जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे १६% व्यक्ती (अंदाजे १.३ अब्ज) सध्या दिव्यांगत्व अनुभवत आहेत.
सीडीसी आणि डब्ल्यूएचओ नुसार दिव्यांगत्वाची व्याख्या शरीराची किंवा मनाची दुर्बलतेच्ची अशी स्थिती, ज्यामुळे या स्थितीत असलेल्या व्यक्तीला काही क्रियाकलाप करणे (क्रियाकलाप मर्यादा) आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाशी संवाद साधणे अधिक कठीण होते (सहभागावरील निर्बंध).
दिव्यांग व्यक्तींसाठी पोषणाचा विचार करताना, मग ते मूल असो किंवा प्रौढ, पोषणाची काही तत्त्वे सार्वत्रिक आहेत. दिव्यांगत्व असलेल्या प्रौढ व्यक्तींमध्ये आढळलेल्या काही रोगांची सुरवात बालपणातील त्यांच्या पोषणामध्ये असते असे संशोधनाने लक्षात आले आहे. म्हणून दिव्यांग मुले आणि त्यांच्या पालकांना पौष्टिक आहार आणि व्यायामाबद्दल जागरूक करणे गरजेचे आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या पोषणासाठी भेडसावणारी आव्हानेः
१. उशिराने होणाऱ्या तोंडाच्या स्नायूंचा विकास, मोठी जीभ, लहान दात यामुळे चावून अन्न खाण्यात समस्या
२. खाण्यापिण्याचे नखरे, विशिष्ट पदार्थच खाणे आणि अनियंत्रित आहार
३. बरोबरीने हायपोथायरॉईडीझम सारख्या इतर वैद्यकीय समस्या असू शकतात; ज्यांचा पोषणावर परिणाम होऊ शकतो.
४. दिव्यांग लोकांमध्ये बद्धकोष्ठता आणि अतिसार, वजन कमी होणे
किंवा वजन वाढणे, पौष्टिकतेची कमतरता यासारख्या वैद्यकीय समस्या असतात.
५. पौष्टिक अन्न निवडणे, तयार करणे आणि शिजविणे याबाबत ज्ञानाचा अभाव
६. कोणत्या प्रकारचे अन्न खावे आणि ते कोणत्या वेळी खावे याबद्दल दिव्यांग व्यक्तींना कमी माहिती / कमी समज असते. या व्यक्तींच्या कुटुंबातील काळजीवाहक व्यक्ती किंवा वसतिगृहातील सहाय्यक कर्मचाऱ्यांना पोषणाबद्दल बऱ्याच वेळेला माहिती नसते.
७. मतिमंद व्यक्तींमध्ये पोषणाच्या समस्या, लठ्ठपणा आणि लठ्ठपणा संबंधित रोग बऱ्याच वेळा आढळतात
८. स्वमग्न व्यक्तींमध्ये अन्नाचा प्रकार, पोत, वास, रंग, तापमान किंवा दृश्यता यांच्या संदर्भात अन्न निवडताना तसेच अन्न खाताना समस्या येतात, स्वमन्न व्यक्तींमध्ये मर्यादित आहार पौष्टिक अन्नाची कमतरता यामुळे हाडांची ताकद, वाढ, प्रतिकारशक्ती यांच्या समस्या जाणवतात
दिव्यांग लोकांसाठी निरोगी जीवनशैली राखण्याचा प्रवास अनेकदा गुंतागुंतीचा असू शकतो. या प्रवासात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. निरोगी जीवनशैलीसाठी योग्य पोषण आणि नियमित व्यायामाचा दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात समावेश करणे आवश्यक आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या योग्य पोषणासाठी काही मार्गदर्शक तत्वे
१. संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार हवा.
२. आहारात संपृक्त तृणधान्ये, डाळी व कडधान्ये, भाज्या व फळे यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा.
३. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा मर्यादित प्रमाणात समावेश करावा. त्यासाठी व्यक्तीची पचनशक्ती समजून घ्यावी.
४. मांसाहार कौटुंबिक चालीरीतीप्रमाणे आणि व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे असावा.
५. पुरेसे पाणी आहारात समाविष्ट करा.
६. साखर, तेल, तूप ह्यांचा अत्यल्प प्रमाणात समावेश असावा.
७. आहारात चोथायुक्त पदार्थ (उदा. फळे, पालेभाज्या, कडधान्ये) जरूर असावेत.
८. योग्य, व्यक्तिसापेक्ष भोजन हवे आणि त्याचे नियोजन कुटुंबातील काळजीवाहक व्यक्तीने करणे आवश्यक आहे
९. दिव्यांग व्यक्तींना सुरु असलेल्या औषधांचा आहारावरील परिणाम समजून घेऊन आहाराचे नियोजन करणे आवश्यक असते.
१०. नियमित शारीरिक व्यायामाची दिव्यांगांना लहानपणापासून सवय लावणे उपयुक्त.
११. दिव्यांग व्यक्तीसाठी आहाराच्या सवयी लावताना आवश्यक ती विशेष उपकरणे वापरणे उपयुक्त ठरते.
दिव्यांग व्यक्तींनी कोणते अन्न टाळावे?
ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट, परिष्कृत (रिफाइंड) कर्बोदके, कृत्रिम गोड पदार्थ आणि प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले पदार्थ दिव्यांग व्यक्तींनी टाळावेत. हे पदार्थ मेंदूच्या कार्यात अडथळा आणतात आणि त्यामुळे दिव्यांग व्यक्तींनी ते टाळले पाहिजेत.
दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात ही मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केल्यास त्यांचे जीवनमान सुधारू शकते. परंतु हे लक्षात घेणे आवश्यक आहे की दिव्यांग व्यक्तींच्या वैयक्तिक परिस्थिती भिन्न असू शकतात आणि वैयक्तिकृत सल्ल्यासाठी त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा. बालपणापासून दैनंदिन जीवनातील क्रियाकलापांचा विकास केल्यास, सर्वांगीण पोषणास महत्व दिल्यास आणि त्याचे प्रशिक्षण दिव्यांगत्व असलेल्या प्रौढांना दिल्यास त्यांना अर्थपूर्ण जगणे शक्य होईल.

डॉ. अश्विनी गोडबोले
बालाहार व विकास तज्ञ
www.chiranjeevgodbole.com
