खेळ आणि उपचार पद्धत
खेळाची सुरुवात प्रत्येक व्यक्तिच्या जन्मापासूनच होत असते. नवजात बालकाने स्वतःच्या हातापायाची हालचाल करून व्यक्त केलेला आनंद हा मुलभूत खेळाचाच प्रकार आहे. खेळामधे सक्ती नसते. खेळामधे निर्भेळ आनंद असतो, खेळामुळे व्यक्तिचा शारिरीक व मानसिक विकास होण्यास मदत होते.
खेळाचा मुख्य उद्देश स्वयंशिस्त निर्माण करणे, आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढविणे हा आहे. खेळ हा सभोवतालच्या जगाशी मैत्रीचे नाते जोडण्याचा एक मार्ग आहे. ह्यातून सामाजिक एकात्मता साधली जाते. समानसंधी आणि समान हक्क दिव्यांगांना मिळण्याचे हे एक साधन आहे. खेळ स्वतःच्या भावना, इच्छा, आकांक्षा व्यक्त करण्याचे एक नैसर्गिक साधन आहे. खेळातून नवनवीन कौशल्ये शिकता येतात.
दिव्यांग/विशेष मुलांच्या बाबतीत विविध प्रकारच्या खेळांची आवश्यकता कित्येक पटीने जास्त आहे. सर्वसामान्य मुले अप्रत्यक्षपणे नकळत खेळातून कौशल्य आत्मसात करीत असतात. पण दिव्यांग / विशेष मुलांसाठी असे खेळ संधी उपलब्ध करून द्यावी लागते. दिव्यांग व विशेष मुलांच्या शिक्षकांनी व पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून मुलांच्या आवडी निवडीनुसार व क्षमतेनुसार खेळाचे आयोजन करून अनुभवाचे क्षेत्र विस्तृत करण्याची निकडीची गरज आहे. खेळ ही आनंददायी, नवीन कल्पना करायला लावणारी उत्स्फूर्त आणि दिव्यांग / विशेष मुलांचा सर्वांगिण विकास करणारी नैसर्गिक आणि स्वाभाविक कृती आहे.
क्रिडा वर्तनात अनेक प्रकारच्या वर्तनाचा सामावेश होतो, यात व्यक्तिगत व समूहाच्या सांधिक वर्तनाचासुद्धा अंतर्भाव असतो. शारिरीक कृती, कौशल्ये, अंतरीक प्रेरणा, तत्कालिन भावना, आत्मविश्वास, धाडस, सहकार्य, स्पर्धा अशा विविध शारिरीक व मानसिक घटकाचा सामावेश क्रीडावर्तनात केला जातो.
खेळाचा उपयोग एक उपचारपद्धती म्हणून केला जावा ही संकल्पना सर्वप्रथम इंग्लंडमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. लुडविक गरमन यांनी जगासमोर मांडली. खेळल्यामुळे स्नायू कणखर आणि बळकट होतील. आणि जगात स्वतःचे स्थान मिळविण्यास योग्य मार्ग मिळेल अनेक विशेष खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळप्रकारात राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून हे सिद्ध केलेले आहे.
दिव्यांगांसाठी भौतिक उपचार जसे गरजेचे आहेत. तसेच विविध प्रकारचे खेळ भौतिक उपचारांना पूरक म्हणून अत्यावश्यक आहेत. खेळ दिव्यांगाची / विशेष मुलाची मानसिक व शारिरीक क्षमता टिकवितात. शारिरीक आणि मानसिक समतोल राखण्यास खेळ ही उपचारपद्धती पोषक ठरते. दिव्यांग/विशेष मुलांना त्यांची कौशल्ये या उपचारपद्धतीच्या सहाय्याने सुधारण्याची संधी मिळते. इतरवेळी निष्क्रिय असणाऱ्या शरिराला चालना मिळते व मनाला प्रेरणा मिळते ज्यामुळे दिव्यांग अवस्थेकडे असलेले लक्ष दुसऱ्या सकारात्मक आनंददायी क्रियेकडे वेधले जाऊन आपण काहीतरी
उपयुक्त कृती करत आहोत ही भावना जागृत होते. क्रिडा उपचार पद्धतीत आपल्या सारख्या इतर व्यक्तिशी कसे वागावे ही कौशल्ये आत्मसात करण्यास संधी देते, त्याचबरोबर इतरांशी निरोगी स्पर्धावृत्ती जोपासण्यास मदत करते.
मानसिक अशांती, आक्रमकता असलेल्या मुलांना मैदानी खेळाचा अतिशय फायदा होतो. पळणे, बॉल उंच उडविणे, फुटबॉल, हॅन्डबॉल, बास्केटबॉल या आणि इतर खेळातून त्यांच्या क्षमतेप्रमाणे खेळवून त्यांच्या शरिरातील अतिरिक्त ऊर्जा ही खेळासाठी वापरली जाते. आणि हळूहळू त्यांचा आक्रमकपणा कमी होतो. काही मुले मागे-मागे रहाणारी असतात. कुठल्याच कामात भाग न घेणे, कमी बोलणे, सतत घाबरणे व बावरलेल्या स्थितीत असणे, ही मुले मैदानी खेळामुळे व शरिराच्या मुक्त हालचाली झाल्यामुळे शारिरीक व मानसिक दृष्ट्या मोकळी होतात.
मैदानातील खेळ प्रामुख्याने सामूहिक स्वरुपाचे असतात, त्यामुळे इतर मुलांबरोबर मिळून मिसळून खेळण्यास व त्यांच्याशी संवाद साधण्यास शिकतात. यामुळे त्यांच्यातील असुरक्षिततेची भावना कमी होण्यास मदत होते व भावनिक संतुलन व सामंजस्य विकसित होते.
खेळातून मुलांचा बौद्धिक विकास होतो. मैदानी खेळाचा वापर उपचारपद्धतीतील एक महत्त्वाचा घटक आहे. अडथळा शर्यत, हाताच्या पंजावर चालणे बसून एका विशिष्ट जागी फेकणे, वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या, लंगडी इ. सारख्या खेळातून कारक कौशल्ये विकसित होतात. खेळ हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. आणि मनोरंजन ही प्रत्येक माणसाची मुलभूत गरज आहे.
थोडक्यात दिव्यांग / विशेष मुलांसाठी खेळ हया माध्यमाचा वापर उपचार पद्धती म्हणून जितका अधिक प्रमाणात केला जाईल त्याचा फायदा दिव्यांग / विशेष मुलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी होईल.

अशोक रामचंद्र नांगरे
क्रीडा शिक्षक – बाल कल्याण संस्था
